पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम आर्थिक मदतीसाठी सिल्लोड तालुक्यातील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली.

लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार महसूल विभागाने प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून जिल्ह्यात सर्वप्रथम सदरील यादी वरीष्ठ कार्यालयाला सादर केली आहे. त्याअनुषंगाने पाहिल्या टप्प्यात सिल्लोड तालुक्यातील ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. 

त्यामुळे सिल्लोडसोयगाव विधानसभा मतदारसंघातील पात्र शेतकऱ्यांनी या मदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. सिल्लोड, सोयगाव विधानसभा मतदारसंघात यंदा दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी हातभार लागावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची घोषणा केली होती.

ही मदत दिवाळीपूर्वीच वितरित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेच्या अनुषंगाने सिल्लोड महसूल विभागाने मदत अग्रीम वितरणासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही युद्धपातळीवर पूर्ण केली आहे. 

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्वप्रथम लाभार्थी यादी तयार करून ती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.
त्यामुळे पहिल्या टप्यात सिल्लोड तालुक्यातील हजारांहून ८० अधिक पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.